कालगती अखंड आहे. तो काळ थांबत नाही. थांबलाच तर तो काळ नाही. काळावर मात करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, पण ते अशक्य आहे. महाभारतामध्ये संजयाच्या मुखामध्ये एक वचन आहे
काल: सुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रम: ।
काल: सर्वेषु भुतेषु चरत्यविधुत: सम: ॥
काळावर मात करणे कठीण आहे. काळाची सत्ता अगाध आहे. रामकृष्णदिक अवतारांनाही त्या काळाच्या सत्ते वागावे लागते. ‘जगा काळ खाय । आम्ही माथा दिला पाय ॥’ म्हणणारे श्री तुकारन महाराजांसारखे संतच असु शकतात. काळाच्या पलीकडे जाण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. भतृहरीनेही वैराग्यशतकामध्ये काळाचे माहात्म ओळखून त्याला नमस्कार केला आहे.
‘सर्वं यस्य वशाद्गारुत्स्मृतिपंथ कालाय तस्मैं नम: ।’
प्रवाहाच्या विरुध्द वागणे अथवा पोहणे हे मानवाच्या शक्यतेच्या कोटीतील गोष्ट नव्हे. जरी त्याने तसा प्रयत्न केला, तर कालांतराने त्याच्या हे लक्षात येइल की या प्रयत्नात काळ खुप गेला पण हात रिकामेच राहिले. त्यामुळे त्याला विरोध करण्यापेक्षा त्याचा योग्य तो उपयोग करुन घेणे हेच शहाणपणाचे आहे. कोणतेही कर्म चालू असताना काळाचे गणित अखंड चालू असले म्हणजे काळाचा योग्य उपयोग होइल. योग्य काळाचा योग्य उपयोग झाला पाहिजे. कुमारसंभवात म्हटले आहे,
निर्वाणदीपे किमु तैलदानम चौरे गते वा किमु सावधानम् ।
वयोगते किं वनिताविलास: पयोगते किं खलु सेतुबन्ध: ॥
दिवा शांत झाल्यावर तेलाचा काय उपयोग? चोरी झाल्यावर सावध हो ऊन काय उपयोग? वय झाल्यावर विलास काय कामाचा? पाणी गेल्यावर सेतु बांधून किंवा पाळ करुन काय उपयोग?
त्याचप्रमाणे काळ गेल्यानंतर विचार करुन काय उपयोग?
सावध !! सावध !! सावध !!
No comments:
Post a Comment